Sunday, August 28, 2011

सेंटर हिल लेक ची रात्र ...

शेवटी मागच्या आठवड्या मध्ये मास्टर्स चा डिफेन्स झाला आणि आयुष्य परत ब्लोग्गिंग च्या रुळावर आले...थोड्या पार्ट्या आणि नंतर चा आराम (त्याला इंग्लिश मध्ये hangover म्हणतात !) झाल्या वर आज लिहायला बसलो...(तसा मागचा महिना thesis लिहून लिहून डोक्याची मंडई झाली होती !)

दीड महिन्यापूर्वी कुक्वील च्या जवळच्या एका सरोवारची रात्र सहल झाली होती....आमच्या मधले सगळे फोटोग्राफर वीर त्या center hill lake ला हजर होते...गौतम च्या नवीन कॅमेराचे उद्घाटन पण करायचे होते... तसा हा center hill lake एका धरणामुळे तयार झाला आहे...त्याचे ६५ मैल नुसते पाणी म्हणजे वेड लागायची पाळी...!

संध्याकळी पोचलो तिकडे... "संधी प्रकाश" काय मस्त नाव आहे ना ..फोटो काढण्यासाठी निसर्गाने दिलेली अप्रतिम "संधी"...!


माझे न्यूयॉर्क-कालीफोर्नियाचे मित्र त्यांच्या इकडच्या Hummer-Ferrari च्या गोष्टी मला सांगतात...पण हा फोर्ड चा जुना ट्रक मला जास्त भावतो... असे ट्रक आणि ते चालवणारे कंट्री आजोबा यांचे एक गुढ नाते असते ते नव्या गाड्यामध्ये मला कधी दिसले नाही..


अंतरंगात घेऊन जाणारा आणि खोलीचा अंदाज न देणारा हा पूल...एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या मनासारखा...!


हा माझा मित्र गुगल उर्फ श्रीसागर ...फोटोग्राफी चा माझ्या सारखा वेडा...आमच्या वेड्यांचे स्वतःचे फोटो कोणीच काढत नाही..
आणि कोणाला हौस पण नसते...पण कधीतरी फेसबुक च्या भुकेसाठी आम्ही असे एखाददुसरे स्वतःचे अजरामर फोटो काढतो... ;)


रात्र झाली आणि मग आमचे चालू झाले फोटोग्राफीचे प्रयोग (तिकडे पण संशोधन तिच्या मायला !) कॅमेरा tripod वर लावला...गुगल चा SLR असल्याने अमर्यादित शटर स्पीड मिळाला... Motorola Attrix mobile फोनचा उपयोग torch सारखा केला आणि विविध आकार तयार केले....खूप कष्टामधून एक पद्धत सापडली आणि मग फुल धमाल !

हा मीच आहे...इंजिनियर फक्त डोक्याने विचार न करता मनाने पण विचार करतात...आणि जेंव्हा करतात तेंव्हा त्याचा परिणाम खालचा फोटो असतो...


हा गौतम माझा प्रोफेसर मित्र....Mathematics Modeling मध्ये खेळणारा ...त्याला आम्ही आमच्या केमिकल संयुगामध्ये कैद केले....


गणपती कुमार ...खूप विचारी आणि अवकाश संशोधन हा त्याच्या छंद !


The Batman ..गुगल उर्फ श्रीसागर ....कुठली पण गोष्ट विचारा आणि कधी पण विचारा २ सेकंदामध्ये उत्तर मिळते अशी त्याची ख्याती...

मी, श्रीराम आणि गुगल...आमच्या युनिवर्सिटी वर जीवापाड प्रेम करणारी लोक....Tennessee Tech University ला (TTU) ला शेवटी आम्ही आमच्या डोक्यावर बसवले...


(हे शेवटचे long exposure चे फोटो श्रीसागर,गणपती,मी,गौतम,श्रीराम आणि पद्मनाभनकुमार यांनी मिळून काढले आहेत .)
Sunday, June 12, 2011

जीवाची मुंबई ...उन्हाळ्यात ती पण माझ्या कॅमेरात !

आज शेवटी पोस्ट लिहायचा मुहूर्त सापडला....सेमिस्टर संपली तसा मी भारतात १ महिना जाऊन आलो....आधी विचार होता कि तिकडे जाऊन एखादे तरी पोस्ट टाकावे..."जे कुकविले मध्ये करतो ते पुण्यात करून काय फायदा" असे म्हणून टाळले गेले....एकडे टेनेसीला आल्यापासून मास्टर च्या थेसिस ची गडबड चालू झाली त्यामुळे त्यात १ आठवडा गेला....खूप फोटो काढले होते ते फोटोच शेवटी सांगयला लागले कि बाबा आत्ता तरी आम्हाला पोस्ट कर...!

भारतात पहिल्यांदा गेलो त्यामुळे जास्त भटकंती केली नाही....फक्त एकदा मुंबई ला गेलो....तसा म्हणता माझा जन्म ठाण्याचा (म्हणजे अर्धा मुंबईकर !)पण अशी शांतपणे मुंबई ती फिरणे झाले नव्हते ...नशिबाने सायलीला मुंबई युनिवर्सिटी चे काम निघाले तिच्या बरोबर माझी स्वारी निघाली... सायली म्हणजे मुंबई ची चालतीबोलती मार्गदर्शक....कुठे काय सही खायला मिळते त्यापासून कुठली इमारत किती साली कोणी बांधली (स्थापत्य शास्त्राची पदवीधर ते पण जे.जे मधून !)याची तिला बेक्कार माहिती....त्यामुळे सकाळी दादर -कुलाबा -सांताक्रूझ-कुर्ला-जेजे असे मुंबई दर्शन झाले...त्यात माझा कॅमेरा आणि तिचे तोंड कायम चालू होते (अजूनही मला फोटो बघताना तिचा आवाज ऐकू येतो....;))


दक्षिण मुंबई मध्ये रस्त्यवरून फिरताना अनेक जुन्या इमारती लक्ष वेधून घेत होत्या....मी तर किती तर वेळ वेडा होऊन बघतच बसलो होतो....प्रत्येक इमारतीचा एक इतिहास होता तरीसुद्धा त्या वर्तमानाला तोंड देत उभ्या होत्या....अगदी जुन्या पारशी बाबा सारख्या,...मधेच ही १०० कोटी ची इमारत दिसली....एकदा माझ्या एका अमेरिकन मित्राला मी त्याबद्दल सांगत होतो (तेंव्हा मला त्या इमारतीचा फुल अभिमान वगैरे वाटत होता !)तो म्हणाला "असेल १०० कोटीची पण याचा तुमच्या देशातील सामान्य लोकांना उपयोग काय..?" माझ्या कडे काहीच उत्तर नव्हते...या किल्ल्यावाल्याकडे बघून मला एक नेहमी प्रश्न पडतो कि "हे कुठली पण किल्ली बनवू शकतात मग चोरीचे-घरफोडीचे विचार करत असतील का ?" पण बहुतेक त्यांनी पण स्पायडरमॅनचे बोलणे ऐकले असणार "great power comes with great responsibility !"हा आहे दादरचा कबुतरखाना ! माझी आई दादरची ..तिचे सगळे बालपण शिवाजीपार्कच्या समोर केशवभुवन मध्ये गेले...त्यामुळे दादर मधून जात असताना "आई एकडे लहानपणी गेली असेल का ?"या विचाराने मला वेडावून सोडले होते...
माझी आई बँक ऑफ इंडिया मध्ये २५ वर्षापेक्षा जास्त नोकरी करते आहे....तिच्या साठी हा फोटो काढून आणला कारण याच इमारती मधून तिने कॉलेजनंतर नोकरी चालू केली होती...या इमारतीचे दगड म्हणा किंव्हा texture म्हणा मला मोहून टाकत होते....माझी अन्न्दाती बँक म्हणून फोटो सहज खपून जाईल....Taxi मधून ५० kmph ला काढलेला फोटो येवढा चांगला येईल असे वाटले नव्हते....हाजी-अली चा दर्गा !हा फुटपाथ आहे या वरती माझा आधी विश्वासच बसत नव्हता....आत्ताच्या काळात पण रस्ते वाढवण्याच्या क्रेझ मध्ये पण तो टिकून राहिला हेच मुंबई चे वैशिष्ट्य आहे...
"लव्ह केलिये साला कुच भी करेगा !" वरळी सी-लिंकक्रॉफर्ड मार्केट ....एवढ्या गर्दी गोंधळा मध्ये मी शांत झालो आणि click केले...आकाश पण सही होते आणि कॅमेराने पण साथ दिली..१८६३ मध्ये हे वाचनालय चालू झाले...David Sassoon याने त्याकाळी ६०००० रुपयाची देणगी दिली म्हणून हे वाचनालय उभे राहिले...मुंबई चा हा असा इतिहास तिथल्या लोकांमुळे कधी इतिहास वाटलाच नाही...
सायलीने माहिती पुरवली जे डावीकडे दिसते आहे ते वाटसन होटेल आणि उजवी कडचा राजाभाई टॉवर ...आणि मी direct १५ वर्ष मागे पोहचलो....बाबा मला मुंबई दाखवायला घेऊन यायचे "राणीचा बाग,prince of wales museum,म्हातारीचा बूट, getway of India असे करत आम्ही बेस्ट मधून मुंबई फिरायचो..

Sunday, April 10, 2011

माझ्या गावाची लाईट ट्रेल फोटोग्राफी...

सेमिस्टर संपायला आली आहे त्यामुळे सगळी कडून आवळलो गेलो आहे....शेवटी परवा "गेले सगळे खड्यात !" असे म्हणून कॅमेरा घेऊन बाहेर पडलो....कुठे जाणार काहीच नक्की नव्हते....

असच १ मैल चालत चालत एका पुलापाशी पोचलो...तो पूल आमच्या कुकविल मध्ये नॉर्थ विलो रस्त्यावरून जातो... बाजूच्या गवतातून कसे बसे चढून (पोलीस मामा कडे लक्ष ठेवून :)) वर पोचलो आणि वेडा झालो.....
दोन्हीबाजुला किर्र झाडी ...त्यात रेल्वे रूळ अदृश्य झालेले ....खालून ८० मैलाच्या वेगात गाड्या जात आहेत.....वरती चढून त्या रस्त्याला बघून मी ओरडलो.."कुकवील चा किंग कोण ?"...

जोरात जाणाऱ्या गाड्या मला नेहमी hypnotize करतात...तीच गत माझ्या कॅमेराची पण झाली...."long exposure " फोटोग्राफी चालू झाली....सोप्या शब्दात " कॅमेरा चे शटर जास्त वेळ उघडे ठेवायचे आणि फुकटचा प्रकाश येऊ द्यायचा !" ..हे करून नंतर जे पिकासो चे चित्र होते त्याला तोड नसते...

मस्त पैकी tripod लावला आणि चालू झालो....माझ्याकडे SLR कॅमेरा ( माझा कॅमेरा Nikon 90 !) नसल्याने जास्त प्रयोग करता आले नाही...जास्तीत जास्त शटर ८ सेकंद उघडे ठेवू शकलो...

बेक्कार ओवरटेक कसा करायचा हे माझ्या मी पुण्याचा असल्याने रक्तात आहे...पण पहिल्यांदाच प्रकाश रेषेचा ओवरटेक बघत हतो...पुणे-ठाणे डेक्कन एक्सप्रेस ने प्रवास करतना घाटामध्ये रुळाचे सांधे बदलताना बघणे म्हणजे सोनेपेसुहागा ....तश्याच प्रकारचा अनुभव माझा कॅमेरा टिपत होता...दोन समांतर रेषा एकमेकांना मिळत का नाही ? .....नसतील मिळत....असतो एकेकाचा स्वभाव...;)
इति ...पुलं ( बिगरी ते म्याट्रिक )शाळेच्या मैदानात सगळे सरळ पळताना एक चुकार मुलगा जशी मधेच कल्टी मारतो ..तशीच ती लाल रेषा कल्टी मारते आहे...चौकामध्ये तर अजून मजा होती....कसा फोटो येईल याचा काहीच अंदाज येत नव्हता...जेंव्हा ८ सेकंदाने फोटो यायचा तेंव्हा तो पिकासोचे abstract बनून बाहेर यायचा..मेक्सिकन होटेलची Neon sign मला तुफ्फान आवडते...त्यांनी एका कॅक्टस मध्ये अख्खा मेक्सिको उभा केला आहे .

Friday, March 25, 2011

पुळचट रिआलिटी शो चा शो ऑफ !!!!!

एकडे टेनेसी आल्यापासून माझे टीव्ही पाहणे खूप कमी झाले आहे...म्हणजे मी भारतात असताना जास्त बघायचो असे नाही....पण animal planet,Nat Geo आणि Discovery यात बेक्कार जास्त रमायचो...येथे या वाहिन्यावरती कुत्रे आणि मांजरांचे सगळे कार्यक्रम असतात त्यामुळे माझ्या सारख्या जंगली प्राण्याला ते पाळीव कार्यक्रम बघवत नाहीत....

दुसऱ्या वाहिन्यांवर "रिआलिटी शो" नावाचे भयानक प्रकार चालू असतात....या मध्ये वेगळे वेगळे प्रकार पण असतात...

समाजाने सोडून दिलेल्या ,वाया गेलेल्या मुली एका घरात कोंबायच्या आणि त्यांना मांजरी(मांजरी पेक्षा कमी कपडे असतात त्यांचे ;)) सारखे भांडायला लावायचे..मग तयार होतो "Bad Girls "
असेच मुलं मुली एकत्र टाकायच्या की झालं "Jersey Shore"..
शाळेतल्या मुलांचा अजून बिभत्स प्रकार म्हणजे "Skins"... माझ्या तरुण वयाला पण हे शो एकटे बघताना पण लाज वाटते...मी आई-बाबांबरोबर तर हे शो बघणे कल्पना पण नाही करू शकत......

हे झालं अमेरिकेमध्ये पण भारतात पण या वरुनच "बिग बॉस" निघतो...त्यात पण अशीच निर्लज्ज माकडं एका घरात भरतात.... त्यांचे माकडचाळे वाहिनीचे TRP वाढवतात...
राखीच्या स्वयंवरात लग्नाचा बाजार मांडला जातो...
"रोडीज" लावले की "पिप पिप" सोडून काही ऐकू येत नाही...या रोडीज मध्ये राग व्यक्त करायला एवढ्या शिव्या का द्याव्या लागतात मला अजून समजले नाही...त्या रोडीजचे टास्क म्हणजे तर मला विनोदच वाटतो...पेटीमध्ये परप्रांतीय मुलीला(मराठी मुलीला मी तरी कधी पहिले नाही अजून...;)) झोपवून तिच्या वरती पाण्यातले साप सोडून किवा झुरळे सोडायचे आणि तिच्या इंग्लिश किंचाळ्या लोकांना ऐकवायच्या ..असे सगळे गरीब प्रकार !.....यात तर मला त्या सापांची आणि झुरळांची दया येते...("त्यांनी मागच्या जन्मी पाप केले म्हणून या जन्मी रिआलिटी शो मध्ये काम मिळाले !")

असे अनेक कार्यक्रम रिआलिटी शो च्या नावाखाली सुशिक्षित लोकं उत्साहाने बघत असतात... यामध्ये रिआलिटी कुठे येते हे त्याचं त्यांनाच माहित...हीच गोष्ट जेम्स वेलस्ली त्याच्या "रिअल" या गाण्यातून सांगतो...आपण जे आयुष्य जगत असतो ते या रिआलिटी शो मध्ये कधीच दाखवत नाहीत....जे काही दाखवतात ते रिआलिटी च्या जवळपास पण जात नाही...म्हणूनच हे गाणं आपल्याला खूप शांतपणे आपल्याला खऱ्या रिअलिटी कडे घेऊन जाते...रिआलिटी शो च्या एका भागामध्ये ती मुलगी "तो" तिच्या प्रेमाला उत्तर देत नाही म्हणून रडते ...पुढच्या मध्ये ते दोघे एकत्र येतात ( ते कसे जवळ येतात आणि काय काय करतात हे देशा-देशावर अवलंबून आहे...;))...नंतरच्या भागामध्ये तो तिला सोडून जातो .....मग प्रेमभंगाचे नाटक आणि दुसऱ्याच्या खांदा ... शेवटी येरे माझ्या मागल्या ...

याला थोडीच रिआलिटी म्हणतात....?

५७ वर्षाचा सुखी संसार करून आपली बायको आपल्या खांद्यावर शेवटचा श्वास घेते... तेंव्हा जे प्रेम वाटते ...एकटे वाटते ...भीती वाटते ..."ते सगळे रिअल....आणि शेवटी ती देवाकडे जाताना तिचे आपल्या डोळ्यात बघणे ती रिआलिटी...!"

आपल्या आजूबाजूचे लोकं,गृहिणी असे रिआलिटी शो सारखे कपडे कधीच घालत नाही .....किंवा त्यांच्या डोक्यावर cowboy hat घालून त्याच्या अंगात धाडस येत नाही..... त्यांचे धाडस म्हणजे महिन्याच्या शेवटी कसे पण करून आहे त्या पैशात "दुध ,पेपर,लाईट ,पाणी बिल भरायचे आणि कुंटुबाला सुखी ठेवायचे ......"हीच ती रिआलिटी आणि हेच त्यांचे खरे धाडस ....."

(२६ जुलै चा )मुंबई चा मुसळधार पाऊस त्यातून survive होऊन लगेच ऑफिस ला जाणारे मुंबईकर...जपान मधला ११ मार्च चा भूकंप त्यातून एकमेकांना आधार देणारे जपानी लोकं..
"अशीच कोणतीही जीव घेणारी नैसर्गिक आपत्ती म्हणजे रिअल आणि तिच्याशी मरेपर्यंत लढणारे लोकं म्हणजे रिआलिटी...."

आर्थिक मंदीमुळे नोकरी जाणे ...पैसे नसल्यामुळे राहते घर विकायची वेळ येणे ..बायको-मुलांना रस्त्यावर यावे लागणे .. असे अनेक अवघड संसारिक प्रश्न ...आणि त्याची उत्तरे शोधणारी माणसे ...
"हेच प्रश्न म्हणजे "रिअल" आणि त्यांना भिडणारी माणसे म्हणजे रिआलिटी...!"

जेम्स आपल्या सगळ्यांना मनातून वाटतेच तेच त्याच्या गाण्यात सांगतो...
त्यामुळे अगदीच तुम्हाला रिआलिटी बघायची इच्छा झाली तर Danny Boyle चा "127 hours " बघा ....अनुभवायची असेल तर सोमवार ते शुक्रवार मध्ये सकाळी ८३५ ची CST लोकल ठाण्यावरून पकडा किंवा पुण्याच्या नाविपेठेतल्या विठ्ठल मंदिराच्या ट्राफिकमधून संध्याकाळी गाडी बाहेर काढा....पण हे पुळचट रिआलिटी शो बघणे बंद करा....!

Monday, March 7, 2011

तो एक सैनिक आहे ...!

कुठले पण बातमीपत्र उघडले की महत्वाच्या बातम्या या जगभरातल्या युद्धांच्या असतात.....अमेरिका कशी इराक ,अफगाणिस्तानमध्ये घुसते आहे ?,ओबामा चे मत काय ? लिबिया मध्ये कसे युद्ध पेटले आहे ? ब्रिटीश राज्यकर्ते कसे युद्धाचे डावपेच खेळतात आहे..? या बातम्यांमध्ये फक्त राष्ट्र आणि राजकारणी बदलत असतात युद्ध तर चालूच असते..पण या युद्धाचे प्रमुख घटक सैनिक यांचा कुठेच उल्लेख नसतो...त्यांचे नाव कधी Fortune 2011 च्या यादीत नसते किवा सिलेब्रिटी लिस्ट मध्ये नसते...

जो पर्यंत युद्ध आपल्या घरापर्यंत पोहचत नाही तो पर्यंत "अपनेको क्या ?" या attitude मध्ये आपले सगळे आयुष्य निघून जाते ."पैसे,घर ,गाड्या ,बायको-मुलं यातच आपण मग्न होऊन जातो..या सैनिकाची आठवण विरून जाते...

अश्याच एका सैनिकाची आठवण मी तुम्हाला आज करून देणार आहे .....हे गाणं एका "अमेरिकन" सैनिकावर लिहिले आहे...यातला अमेरिकन हा शब्द गौण आहे कारण सैनिकाला देश,धर्म,जातपात काही नसते....युधिष्ठिराने म्हणले आहे की "सैनिक हाच एक एक धर्म असतो..." .हेच सोप्या शब्दात Toby Keith (टोबी केथ ) सांगतो......आपण लोक ज्याचा कधी जास्त विचार करत नाही त्या वरतीच टोबीने हे गाणे लिहिले आहे.....त्याला पण त्याचे कुटुंब आहे... त्याचे त्याच्या मुलांवर आणि बायको मुलांवर जीवापाड प्रेम आहे ...त्याला पण घरची जवाबदारी आहे...पण जेंव्हा duty वर जायचे पत्र येते तेंव्हा तो काहीच करू शकत नाही कारण "तो एक सैनिक आहे..."

तो सगळ्यांसाठी आहे पण त्याच्या साठी कोणी नाही...तो पैश्यासाठी काम करत नाही...किंवा त्याला प्रसिद्धी पण नको आहे...तो फक्त देशासाठी लढणे माहित आहे कारण "तो एक सैनिक आहे..."

तुमच्या आमच्या सारखे खोटी खोटी कारणे दाखवून तो सुट्ट्या घेत नाही किंवा "चला दिवाळी आली" म्हणून घरी पण येत नाही....तो फक्त देशासाठी आणि देशवासीयांसाठी अहोरात्र जागा आहे...कारण "तो एक सैनिक आहे..."

देशाचे स्वातंत्र्य जेंव्हा धोक्यात येते तेंव्हा तो त्याचा जीव पणाला लावतो.तो धर्म,जात ,पंत याच्या व्याख्येत बसत नाही...त्याला स्वातंत्र्य कधीच मोफत मिळत नाही (आपल्याला मिळणाऱ्या मोफत स्वातंत्र्यासाठी) त्याला त्याच्या जीवाची किंमत मोजावी लागते...
तो स्वतःहून कधीच मरण मागत नाही पण मृत्यू समोर आला तर मरणाला घाबरत नाही.....कारण "तो एक सैनिक आहे..."

हे गाणं ऐका आणि या सैनिकाला कधीच विसरू नका कारण एक लक्षात ठेवा..."तो एक सैनिक आहे" म्हणून आपण सुरक्षित आहोत "!

Wednesday, March 2, 2011

माझे फेसबुक स्टेटस मेसेज चे प्रयोग २ ...!खूप दिवस वेळच मिळाला नाही thermodynamics ची परीक्षा असल्याने झोपेत मला ग्रीक सिम्बॉलच दिसत होते....आज मात्र दिवसभर लिहिण्यासाठी हात शिवशिवत होते..शेवटी मुहूर्त लागला आणि फेसबुक ची गोष्ट डोक्यात सुरु झाली......फेसबुकने मला वेड लावले आहे असे म्हणता येणार नाही "मी आधीच अनेक गोष्टीसाठी वेडा होतो" ते फक्त जगासमोर खुलं करायची संधी मला दिली आहे....मागच्या भागात काही मराठी स्टेटस मेसेज लिहिले होते या भागात काही इंग्लिश स्टेटस मेसेज पण टाकणार आहे...

मी केमिकल मध्ये मास्टर करत असल्याने "संशोधन"(??) करण्याचे पैसे मिळतात ...त्यासाठी जो माझा बॉस किवा शिक्षक असतो त्याला एकडे "adviser" म्हणतात ..."५ दिवसाचे पैसे देऊन १० दिवसाचे काम" कसे करून घायचे याची कला याला साध्य असते....म्हणून ५ दिवस काम करून २ दिवस काम न करण्याचा प्रयत्न मी करत असतो (पण ते अजून शक्य झाले नाही !) म्हणून माझ्या आयुष्याची व्याख्या सोपी आहे..."My life is simple...5 day Adviser 2 day Budweiser"(बडव्ह्ययझर हे एक सोनेरी रंगाचे पेय आहे...;))


विद्यार्थी असल्याने दिवस लवकर लवकर पळत असतात ...एक सेमिस्टर झाली की दुसरी !.....फक्त वीकेंड चा हिशोब डोक्यात राहतो....या विकेंडला खऱ्या अमेरिकन संस्कृतीचे विश्वरूपदर्शन क्लब मध्ये घडते ...तरुणाई कडे बघून "क्षणभंगुर ती रात्र होती " असेच वाटत राहते .....तसेच मला नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाटले
"मागचे वर्ष कधी संपले ते कळलंच नाही....."US मध्ये दिवस कसे जातात कळत नाही"


नवीन सेमिस्टर चालू होणार होती ...नाताळ च्या सुट्टी मधला आळस गेला नव्हता (घालवायचा पण नव्हता ..;))माझी प्रार्थना चालू होती.."सांग सांग भोलेनाथ ..."बर्फ पडेल का? अंगणामध्ये बर्फ साठून सुट्टी मिळेल का? "
...आणि ४ दिवस सुट्टी मिळाली."
.:)

फेसबुकच्या वॉल वर सगळेच काहीना काही लिहीत असतात ..ते वाचून मला खूप वेळा समजते की त्याची/तिची मनस्थिती काय आहे किवा कोणाचा काय घोटाळा चालू आहे...;) त्यातूनच एक नवीन म्हण निर्माण झाली "फेसबुकच्या वॉलला(भिंतीला) पण कान असतात "


जानेवारी महिना चालू झाला आणि एक दुःखाची बातमी आली "पंत गेले "(प्रभाकर पणशीकर )...मी त्यांची दोनच नाटके पहिली होती तरी सुद्धा त्यांचा मी निस्तीम चाहता चाहता आहे. ...माझ्या डोक्यात त्याक्षणी आले ......तो मी नव्हेच मधला हा लखोबा लोखंडे साक्षात यमासमोर पण म्हणला असेल" तो मी नव्हेच !"


२ महिन्यापूर्वी एका मित्राचे बेक्कार ब्रेंक अप(complete दोन्ही जीवाची तडफड इ.) झाले...त्याचे मला सारखे फोन यायचे आणि मग माझे अनुभवाचे सल्ले चालू व्हायचे..माझ्या अनुभवाचा एक सल्ला त्याला ऐकवला "Behind every successful man, there is an "Ex Girl friend"..त्यामुळे तो मित्र आत्ता यशस्वी बनायच्या मार्गावर आहे...


शाळेत असताना विश्वास पाटलांचे पानिपत वाचल्यावर मी आनंदीबाईना बेक्कार शिव्या घातल्या होत्या ...त्याच आठवणी परत मागच्या महिन्यात जाग्या झाल्या कारण पानिपतच्या लढाई ला १५० वर्ष झाली होती ....तेंव्हा एक डोक्यात विचार आला ""पूर्वीच्या काळी "स्पेल चेक" असते तर आनंदीबाई कडून "ध चा मा " झाला नसता ....आणि मराठे शाही वाचली असती..."


असे हे माझे स्टेटस मेसेज चे प्रयोग चालूच असतात ..त्या खाली येणाऱ्या comments वाचून हसून हसून मी संपून जातो...यामुळे माझा खूप मित्रांशी संवाद वाढला आहे ...ते नुसते लिस्ट मधले फोटो न राहता माझे मित्र बनून रोज समोर येतात.....

Saturday, February 12, 2011

माझे फेसबुक स्टेटस मेसेज चे प्रयोग...!"FACEBOOK" हे या मागच्या काही वर्षातले व्यसन ....पण आत्ता तो धारावी पासून time square पर्यंत सगळी कडे पसरले ....मी पण त्याची शिकार झालो.... २००९ चालू झाले तेंव्हा मला कोणी सांगितले असते की "फेसबुक भारी आहे" तेंव्हा मी त्याला वेड्यात (सभ्य शब्द !)काढले असते...

त्याकाळी ऑर्कुट जिवंत होते पण मी त्याची शिकार वैगैरे झालो नव्हतो...एकडे Cookeville ला आलो तेंव्हा पासून ऑर्कुट मृत्यू शय्ये वरती होते..आणि थोड्या दिवसात ते वारले ...आणि मग माझ्या फेसबुक वरती एकावेळी असे ४० लोक वगैरे online दिसायला लागली..माझा फेसबुक वेड येथून चालू झाले....जे काही सुचेल ते status मध्ये टाकायचे ,नवीन फोटो काढला ,गाणं ऐकले की टाक फेसबुक वर असे चालू झाले...त्यातूनच भन्नाट अश्या काही status मेसेज चा जन्म झाला...याच प्रत्येक मेसेज ची एक वेगळी कहाणी आहे...

भारत सोडताना २ वेळचे फुल तूपभात जेवण आणि संध्याकाळी पोहे,सांजा अश्या वाईट सवयी लागलेल्या त्याच घेऊन मी एकडे आलो...येथे तर मला कोणी हे सगळं देणे शक्य नव्हते ..स्वतःला जगवण्यासाठी काही तरी केले पाहिजे म्हणून अंडी खायला चालू केली... मग काय सकाळचा नाश्ता ,दुपारचे जेवण ,संध्याकाळचे खाणे..यात सगळ्या मध्ये अंड्याने एंट्री मारली....

म्हणूनच मी म्हणतो "माझ्यासठी अंड हेच पूर्णब्रह्म !"..

याच अंड्याची आम्लेट बनवत होतो...पण ते खूप वेळा मला उलटवता न आल्यामुळे त्याची भुर्जी व्हायची ...असच करता करता मी "आम्लेट उडवायला शिकलो!"

एक दिवस दुपारी गौतम-निवेदिताने घरी जेवायला बोलावले आणि त्या "गरम पोळ्या आणि वांग्याचे भरीत खाऊन मला मोक्ष मिळाला.."!


प्रत्येक सणासुदीच्या दिवशी घरची मला खूप आठवण येते ....दिवाळी आली तर इमोशनल अत्त्याचार होतो.सगळं लहानपण आठवते त्यातून मग हा मेसेज आला.

."चकलीच्या भाजणीचा वास ,मातीचा अळीव पेरलेला किल्ला ,कंदीलातून झिरपणारा केशरी प्रकाश,रस्त्यावरचा फटक्याचा धूर ,kingcong छाप सुतळी बॉम्ब "...या गोष्टी online मिळतात का कुठे ...

स्वदेसचे "ये जो देश हे मेरा "२६ जानेवारी ला ऐकत होतो...आणि एकदम मला माझी शाळा आठवली...

"न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे मैदान...खाकी हाफ चड्डी आणि पांढरा शुभ्र शर्ट....खिश्यावर तिरंगा पुढे चितळे उभा आणि मागे बिडकर ... "सावधान !" ...पाटील सर घुमटावर ध्वजारोहण करत आहेत......जन-गण-मन अधिनायक जय हे भारत भाग्य-विधाता.".....
हा मेसेज माझ्या अनेक शाळा मित्रांना माझ्या बरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून शाळेत घेऊन गेला...


असे म्हणतात की "पुणे" आह शब्द कशाशी पण जोडला गेला की ते प्रसिद्ध होतो...मी तर पक्का पुणेकर त्यामुळे पुण्यावर लिहिणे हा माझा जन्म सिद्ध हक्क...!

"पुणेकराबरोबर वाद घातल्यास पुढचा जन्म पुण्यात आणि तो पण सदाशिवपेठे मध्ये मिळेल !!!"..या मेसेज बद्दल कोणाला काही सांगावे लागेल असे मला वाटत नाही....
सदाशिव पेठेची कीर्ती इस्कीमो लोकांपर्यंत नक्की पोचली असेल....

MTV चा रोडीज हा खूप प्रसिद्ध कार्यक्रम...त्याची सुरवातीची निवड फेरी मी बघत होतो ...तो रघू आणि राजीव शिव्या सोडून काही बोलतच नव्हते.. त..म्हणून मला वाटले...

"रोडीचे ऑडिशन घेण्याच्या आधी रघु आणि राजीव ला सदाशिवपेठेच्या दुकानामध्ये दुपारी १ ते ४ मध्ये पाठवायला पाहिजे म्हणजे त्यांना शिव्या न देता लोकांचा अपमान कसा करायचा ते तरी कळेल..." मला खात्री आहे की असे शिक्षण घेऊन आले तर पुढच्या निवड फेरी मध्ये त्यांना शिव्यांची कुबडी वापरावी लागणार नाही....

मला पुण्याची बेक्कार आठवण येते नेहमी...लोकांच्या मनात स्वप्नसुंदरी वगैरे येत असतील माझ्या स्वप्नात पुण्यातले रस्ते,गल्ल्या ,पण टपऱ्या ,अमृतुल्य येतात...मी २ वर्ष झाली घरी गेलो नाही म्हणून मला गौरी विचारात होती की तू होम सिक वगैरे होत नाही का....तर माझा उत्तर होते...

"आय नेवर गेट होमसिक बट आय म आल्वेज गेट पुनेसिक....."(I never get homesick but I am always get Punesick ")

हे असेच काही माझ्या मनात येईल तसे लहित असतो...अजून खूप काही बाकी आहे...पुढच्या भागात अजून विषय आणि मेसेज लिहीन....ही न संपणारी कथा तुम्हाला नक्की आवडेल...