Saturday, January 22, 2011

पुण्याचे पत्ते - माझा छंद !

आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे ....पण तसं नाही ...ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो....ती पान टपरी,कोपऱ्यावरचे अमृततुल्य ,आतला छोटा बोळ असे सगळे माझ्या डोळ्यासमोर दिसत असते..."पुण्यातले पत्ते शोधणे " हा माझा छंद होता ....

कॉलेज मध्ये असल्या पासून साप पकडायला लागलो तेंव्हा पासून मला हा जोड छंद लागला...सर्पोद्यानात काम करायचो तेंव्हा त्यांच्या बरोबर साप पकडायला जायचो...तेंव्हा "पत्ता शोधणे " हा प्रकार काय आहे याची कल्पना नव्हती..ते काय प्रकरण आहे हे नंतर कळले....

तुमच्या माझ्या सारखे ,आपले मित्र,नातेवाईक जास्तीतजास्त ऑफिस मधले मित्र यांच्या सोडून कुठे पत्ता शोधत नाही...किंवा आपल्याला गरज पण नसते...त्यामुळे माझी पण मजल पण सहकारनगर,पर्वती,सिंहगड रस्त्याचे काही भाग एवढ्याच ठिकाणी आणि ते पण मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये होती ...अश्या मोठ्या जागांचा पत्ता काय अगदी गुगल नकाशा वर पण सापडतो....

आता जरा मुद्यावर येऊयात ...लोकांच्या घरातील साप पकडण्यासाठी आधी त्या "घरी" पोचणे ते पण वेळेत हे सगळ्यात महत्वाचे होते ...मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या...ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे ....मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो...एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे ,मी पोहचेपर्यंत कोणाला पण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा.....आत्ता सांगा पत्ता ?"

ती वक्ती चालू व्हायची..."३२,मधुमालती बंगला,अप्पर इंदिरा नगर "..(जसं काय त्याचा बंगला शनिवारवाडा आहे!)
मी पण माझा सगळ स्कील लावायचो..." VIT पासून वरती आलो सरळ...मग उजवीकडे अप्पर ..ते पहिल्या कोपऱ्या वर किराणा तिकडून कुठे ,डावीकडे का त्या तिरक्या आडव्या गल्लीत,...पण तिकडे तर कचराकुंडी आहे ..OK त्या कचरा कुंडी वरून उजवीकडे का? हा तिकडे एक मटणाचे दुकान आहे..आलो मी त्या दुकानापर्यंत मग पुढे..तिकडे तुमचा माणूस उभा करा आणि फक्त १० मिनिटे द्या मला मी आलो ! त्यांच्या फक्त फोन नंबर घेऊन मी फोन ठेवायचो...पत्ता विचारताना मी स्मरणशक्तीला बेक्कार ताण द्यायचो आणि महत्वाच्या खुणा विचारायचो (engineering च्या परीक्षेला पण येवढा ताण कधी दिला नाही ;))पण एकडे सगळा प्रकारच वेगळा .... तिकडच्या लोकांच्या डोळ्यासमोरची भीती मला एकडे दिसत असायची.हे सगळ जास्तीत जास्त २-३ मिनिटे चालायचे..माझ्या आईला तर आधी वाटायचे "काय झाल या पोराला ?" पाहुणे आले असतील तर अजूनच मजा.....नंतर जे काय कपडे वरती असतील ते घालून साप पकडायची काठी आणि पिशवी घेऊन मी पुढच्या ५ मिनिटात घर सोडलेले असायचे...

माझी सोपी पद्धत होती की ज्या दिशेचा पत्ता असेल तिकडे गाडी भरदाव सोडायची ...त्या साठी डोक्यात गणिते करून मी सिग्नल तोडायचो,गल्ल्यामधून जायचो,मामा-मामी चुकवायचो,फुटपाथ वरच्या हलत्याबोलत्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करायचो इ. ...गाडीवर बसून ४ था गिअर पडेपर्यंत माझ्या डोक्यात एक ढोबळ नकाशा झालेला असायचा...माझा ठरलेला भाग म्हणजे एकडे बिबवेवाडी पासून स्वारगेट,लुल्लानगर-कोंढवा,निलायम पुलाखालचा सिंहगड रस्ता,सहकारनगर,पर्वतीपायथा...असा माझ्या पासून १० किलोमीटरच्या परिघातील भाग...वरती लिहिल्या प्रमाणे स्वतःला त्या पत्याच्या दिशेला झोकून द्यायचो...कोपऱ्यावरच्या पानवाल्याला पत्ता विचार,कोणी cricket खेळत असेल त्यांना विचार ,फेरीवाल्याला विचार असे करून त्या सापपर्यंत मी जास्तीत जास्त १५ मिनिटात पोहोचायचो.(हे करणे लिहिले आहे तेवढे सोपे नाही ज्यांनी पुण्यात घर शोधायचा प्रयत्न केला असेल त्यांना कल्पना असेल....) आणि मग साप पकडून सर्पोद्यान गाठायचो ! (हे कसे करायचो आणि अनुभव दुसऱ्या पोस्ट मध्ये ).....आपल्या इकडच्या लोकांना प्रश्न फार म्हणून मी कधीच सांगायचो नाही मी कशाला पत्ता शोधतो आहे...आजी-आजोबांना आणि बायकांना कोणी नसलेच तर पत्ता विचारायचो कारण आधीच वेळ कमी असायचा आणि आजी-आजोबांना शंका फार...;)

सुरवातीला सुरवातीला खूप लोकांनी फिरवले नंतर एक लोकांचा अंदाज येत गेला आणि मग चुका कमी झाल्या आणि साप जास्त मिळू लागले...(सापापेर्यंत पोचायला लागणारा वेळ आणि तो मिळणे directly proportional आहे....)खूप वेळा मला जनता वसाहत ,आंबेडकर वस्ती,तळजाई वस्ती अश्या डोंगरावर असलेल्या वस्त्यामधून फोन यायचा...तिकडे तर सगळाच भुलभुलैय्या ! अशा वेळी मग कामी यायच्या त्या जुन्या ओळखी ....आधी कधी येऊन गेलो असलो तर तिकडचे खूप लोक ओळख ठेवायचे ते मला त्या वस्ती च्या रस्त्यापासून त्या आतल्या साप असलेल्या घरापर्यंत घेऊन जायचे...काय दृश्य असायचे ते...माझ्या मागे कोणी तरी वाटाड्या बसलेला आहे आणि माझ्या गाडीच्या मागे १०-१२ चीलीपील्ली "सापवाला सापवाला" ओरडत पळत आहेत....

असेच पत्ते शोधत आणि साप पकडत मी ३-४ वर्ष काढली नंतर एकडे आलो अमेरिकेमध्ये ...आत्ता पत्ता शोधण्याची मजा राहिली नाही..काही झालं की GPS निघते आणि पत्ता २ मिनिटात मिळतो...
पण माझ्या साठी GPS काही कामाचे नाही ...

कारण आत्तापण मी डोळे बंद केले तर मी direct पुण्याच्या रस्त्यावर पोहोचतो आणि जुने पत्ते शोधत राहतो....

7 comments:

  1. Masta re..! Mi kahi saap pakadat nahi.. Pan patta shodhanyachya tuzya mapping technique shi relate karu shakato :)

    ReplyDelete
  2. ओंकार ....धन्यवाद मित्रा ! अरे हा तर खूप common अनुभव आहे...पुण्यात तर तो येणारच ....;)

    ReplyDelete
  3. लईच भारी post आहे ओज्या... keep it up man!!!

    ReplyDelete
  4. मस्त पोस्ट आहे ही :D
    हाहापुवा!
    मला ना साप पकडण्याचा अनुभव आहे ना पत्ते शोधण्याचा ( कुठे ही जायचं झालं की मी इज्जतीत बाबांना नाही तर मित्रांना फोन करून बोलावते. मग ते पत्ते शोधात असतात आणि मी मोबाईलवर गेम खेळत बसते. ;) ) तरीही सगळे प्रसंग जशेच्या तशे डोळ्यासमोर आले.
    मस्त खुसखुशीत लिखाण!

    ReplyDelete