Monday, December 27, 2010

बर्फातले काही पराक्रम .....


नाताळ ची सुट्टी लागली आणि मी अभ्यासातून मोकळा झालो ....मागचे काही दिवस खूप बर्फ पडत होता आम्ही घरी बसून कंटाळलो होतो ...मग असच डोक्यात आले की Center Hill Lake ला जाऊ...हा तलाव आमच्या गावाजवळ स्मिथविले ला आहे...एका धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे...गुगल केले आणि ५ मिनिटात निघालो आम्ही...आणि नंतर..........


नकाश्यावरून शोधत शोधत एका कच्च्या रस्त्यावर पोचलो...बाहेर खूप बर्फ पडत होता तरी गाडी आम्ही पुढे नेली ...आणि मग शेवटी ती अडकून बसली....कसे तरी करून गाडी बाहेर काढली आणि त्या जंगलातून परत निघालो...विचार केला तेंव्हा कळले की तो रस्ता direct पाण्यात जात होता...नशिबाने आम्ही तो रस्ता follow नाही केला...:)



बर्फ पडत आहे ...बाहेर तापमान -५ च्या खाली आहे....आणि आम्ही वेड्या सारखे बाहेर पडलो आहोत...



असे कष्ट करून शेवटी आम्ही त्या लेक च्या जवळ पोचलो...पण अंधार झाला होता...हा एकच दिवा त्या निळ्या अंधारामध्ये उठून दिसत होता...



हा तो Center Hill lake.मला वरसगाव किवा खडकवासला आठवले तिकडे पण मी कणीस वाला शोधायचा निष्फळ प्रयत्न केला....



एकटी झाडं मला खूप आवडतात....माझा तो फोटोग्राफी मधला weak point आहे,...मला नेहमी वाटायचे की असं उन्हातानात एकटे लढणारे झाड ब्रेकअप चे प्रतिक आहे...;)



बर्फ नुकताच पडून गेला की घरं अफलातून दिसतात....आणि वरती निळे आकाश असेल तर दुधात साखर...



हे स्वप्नातले घर तुम्ही म्हणू शकतात...बाहेरून इतके भारी दिसते आतून कसे असेल...



असच फिरता फिरता मला ही "कॅडीलाक" दिसली आणि मला एकदम दिवार चा पाठलाग आठवला...काय गाडी होती ती...! ज्याची गाडी होती त्याने अगदी मनापासून जपली होती...

Monday, December 20, 2010

Whiskey Lullaby ..एका विश्वासघाताचे गाणे !

जेंव्हा मी country ऐकायला चालू केले तेंव्हा मला गायक माहित नव्हते म्हणून मी असाच शोधाशोध करत गाणी ऐकायचो.खूप वेळा अशी सुंदर गाणी मिळायची की ती मी सतत ऐकत बसायचो...पूर्वी गाण्यांच्या बाबतीत असे माझे कधीच झाले नव्हते

लहानपणा पासून हिंदी आणि मराठी गाणी आजूबाजूच्या लोकांकडून आपल्याला समजत जातात त्याप्रमाणे आपली आवड निर्माण होते..पण मी अशी "गाणी शोधणे" वैगैरे प्रकार केले नाही....पण अशा मध्ये मला "Country गाणी शोधणे" याचे मला व्यसन कधी लागले हे समजले पण नाही...

अश्याच एका शोध मोहिमेमध्ये मला हे Brad Paisley चे हे गाणे सापडले...गाणं ऐकून झाल्या वर माझ्या भावना सुन्न झाल्या...जी काही गिटार टून आहे तीच टून वाट लावून टाकते ....

या गाण्याचे नाव आहे "Whiskey Lullaby" म्हणजे दारूचे अंगाई गीत...शब्दशः हा अर्थ थोडा विचित्र वाटेल तुम्हाला पण गाणं ऐकले की संदर्भ लागेल...



तो एक सैनिक असतो...आत्ता युद्ध संपले असते तो परत येत असताना त्याला त्याच्या प्रेयसी ने दिलेले वचन आठवत असते...खरतर म्हणजे त्या प्रेयसीच्या ओढीनेच त्याला सुखरूप आणले असते...त्याच खुशीत तो तिला भेटायला जातो आणि ......"ती आणि परपुरुष "..

तो संपतो . विश्वासघात तो सहन नाही करू शकत ..त्याचे दुःख दारूत बुडवायचा प्रयत्न करतो...तिची आठवण त्याच्या हृदयात असते त्यामुळे दारूमुळे पण तो तिला विसरू शकत नाही..."life is short but this time its bigger"....

मरताना पण तो तिला विसरू शकत नाही...कारण ती त्याची जगण्याची प्रेरणा असते..

ती पण त्याची आठवण घालवू शकत नाही...या जन्मी तिला हे शक्य नसते...ती पण दारू पिऊन त्याला भेटायला परलोकी निघून जाते...

ते दोघा कायम झोपी जाताना देवदूत Whiskey Lullaby गात असतात...
या गाण्याबरोबर याचा video पण तेवढाच घुसतो...पुढचे दोन दिवस हलवून टाकतो...

Friday, December 17, 2010

बर्फाळ प्रदेशातला फोटोग्राफर ...

मी खूप दिवसापासून थंडीची वाट बघत होतो...आणि शेवटी तापमान शून्य च्या खाली गेले ...एकदिवस उठलो बाहेर बर्फ पडत होता,हळूहळू सगळ्या गोष्टी बर्फाखाली जाऊ लागल्या...पण नेमका माझा final week असल्याने त्या बर्फाच्या वादळात कॉलेज ला जावे लागले...शेवटी परीक्षा संपल्या आणि कॅमेरा बाहेर पडला...-८ ते -११ सेंटीग्रेड ला फोटोग्राफीची मजा परत एकदा अनुभवली...


आमच्या कॉलेज जवळून रेल्वेचे रूळ जातात ... त्या रूळावर चालण्यात एक वेगळीच मजा येत होती..रुळाच्या क्रॉसिंग वरती खूप सही abstract तयार झाले होते त्याला मी ब्रेक अप abstract म्हणतो...;)



संध्याकाळी म्हणजे ४ वाजता मी आणि अक्षय ने केन क्रीक लेक ला जायचे ठरवले...मागचे काही दिवस तापमान -५ च्या खालीच होते म्हणून आम्हाला वाटले की लेक गोठला असेल...(माझे पहिले पोस्ट ) पण पोपट झाला ....त्या नादात आमची गाडी बर्फात फसली...battery down झाली..

केन क्रीक चा सगळा परिसर पांढरा शुभ्र होता ..झाडांची पानझड झाली होती....



हा फोटो काढताना माझे हात संपले होते...मी gloves विसरलो होतो पण समोरचे दृश्य बघून थंडी विसरलो आणि कॅमेरा सेट केला...



भाऊ भाऊ "romantic काय ते याचं जागेला म्हणतात का?"



या दिव्याला बघून मला बिरबलाची खिचडी आठवली...पण पाण्यात पाय घालायची हिम्मत नाही झाली...


हे माझ्या घरासमोरचे community center आहे ....रोज सूर्य मावळताना फक्त २ मिनिट हा देखावा बघयला मिळतो...
त्या २ मिनटासाठी मी खूप दिवस थांबलो होतो...

Wednesday, December 1, 2010

माझ्या आजोबांची गोष्ट .."He walked on water "

या गाण्याला मी आजोबांचे गाणे म्हणतो...मी माझ्या आजोबांना कधी पहिले नाही.लहानपणी खूप वेळा आई-बाबांकडून त्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत...माझ्या साठी ते एक महान वक्ती आहे...अशी वक्ती की जिचे वर्णन मी शब्दात नाही करू शकत...म्हणून मी जेव्हां मी गाणं ऐकतो तेंव्हा मला माझे आजोबा आठवतात...स्थळ-काळ जरी वेगळा असला तरी मला काही फरक पडत नाही कारण " grandpa " म्हणलं काय आणि "आजोबा " म्हणलं काय दोन्ही माझ्या साठी देवासमान वक्ती आहेत....
Randi Travis हा ऐंशी च्या दशकातला खूप प्रसिद्ध कंट्री गायक..त्याचे हे त्याच्या आजोबांवारचे गाणे आहे...


प्रत्येक लहान मुलाला विश्वास असतो की आपले आजोबा, आपली आज्जी खूप असामन्य आहे...कारण त्यांच्याकडे गोष्टींचा खजिना असतो.....तसेच या लहान मुलाला पण वाटते की आपले आजोबा जगातली काही पण अशक्य गोष्ट शक्य करू शकतात...."अगदी ते पाण्यावरती पण चालू शकतात "(he walked on the water !)

त्याने फक्त आजोबांच्या बंदूक चालवायच्या आणि घोडेस्वारी च्या गोष्टी ऐकल्या आहेत...लहान मुलांना या गोष्टीचे वेड असते ...तसेच या मुलाचे होऊन गेले आहे ..त्याच्या विश्वात त्याचे आजोबा म्हणजे हिरो आहेत....

आजोबांचे ऐकून तो पण झाडूला घोडा बनवून चालवतो तेव्हां त्याचे आजोबा खूप खुश होतात....त्याला पण आजोबांची टोपी घालून एकदम मोठं व्हायचे आहे .....

शेवटी त्याचे आजोबा देवाघरी जातात तेंव्हा तो खूप रडतो....पण अजून पण त्याचा विश्वास कायम आहे....की त्याचे आजोबा पाण्यावरती चालू शकतात..."he walked on water " !
मला माहित आहे की प्रत्येकाला असे कधी नाही कधी वाटले असेल त्यांच्या साठी हे गाणं मी dedicate करतो...

Tuesday, November 23, 2010

शिशिर ऋतूचे शेवटचे सोनेरी दिवस ...

रविवार सकाळ फुल मनाची तयारी करून मी कॉलेज ला निघालो होतो पण आकाश बघून कॅमेरा साठी हात शिवशिवायला लागले .मग मी आणि माझा कॅमेरा ...बाकीचे सगळ जग विसरून गेलो पुढचे काही तास..

डेरीबेरी हॉल च्या जवळची काहीच झाडं अजून आपले सोंदर्य टिकवून आहेत...त्याच्या खाली एक असाच कोणीतरी येऊन बसला आणि मला तो subject मिळाला...


या झाडाचा मी जबरदस्त fan आहे....या झाडं सोबत ही बिल्डिंग आणि वरती निळेशार आकाश...



त्या दिवशी सूर्य लपाछपी खेळत होता आणि मी थांबून थांबून फोटो काढत होतो...



आत्ताचे हे दिवस शिशिर ऋतू संपत आल्याचे दिवस ....ही अशी अनेक विखुरलेली एकटी पाने मन उदास करून जात होती ...



काही दिवसात ही झाडं निष्पर्ण होऊन जातील आणि मग एक प्रकरचे भकास वातावरण निर्माण होईल ...पण हे काही महिन्यांसाठीच असे मनाला बजावत होतो....



ही cycle उचलावी आणि पळून जावेसे मला वाटत होते...romantic जागा म्हणजे काय ? हे हा फोटो बघून समजेल..


या पायऱ्या तश्या फार सध्या होत्या ......त्या मला आधी दिसल्याच नव्हत्या पण जेव्हां दिसल्या तेव्हां माझ्या डोक्यात फ्रेम तयार झाली...त्या light च्या खांबामुळे फोटो ला एक वेगळाच लूक आला..



हे सुंदर झाड एका माणसाला dedicate केले आहे....काय सही concept आहे....तो माणूस सापडला मला तर मी हा फोटो त्याला नक्की mail करीन...


हा या शिशिर ऋतू चा शेवटचा फोटो....या झाडाचे माझ्या कडे १०० एक फोटो असतील... मागच्या वर्षी मी या झाडासाठी वेडा होतो.. या झाडामुळेच या सध्या इमारतीला एक वेगळेच कोंदण प्राप्त झाल आहे....

Saturday, November 13, 2010

जीवनाचे साधे सोपे तत्वज्ञान !


एकडे आल्यावर मला एक जाणवले की अमेरिका मधले खूप लोक एकाकी जीवन जगतात...तरुणपणी खूप काम करून पैसे कमवायचे आणि मजा करायची पण नंतर मुले त्यांच्यात्यांच्या मार्गी निघून गेली की यांच्या समोर "वेळ" कसा घालवायचा हा प्रश्न पडतो.. पुण्यातले सारखे चला शेजारी,कट्यावर,पर्वतीला जाऊन गप्पा मारण्यासारखे यांना कोणी मिळत नाही....आणि मग चालू होते "शेवटचे दिवस मोजणे".......

(खूप गंभीर अशी सुरवात झाली पण त्याची गरज होती..)

हे गाणं आहे "Billy Currington" चे एकदम शांत आणि फक्त गिटार वर वाजवलेले.
या बिली ला एक आजोबा बार मध्ये भेटतात आणि तो गप्पा गोष्टी चालू करतो....वास्त्वतः कोणी बार कोणी आजोबांची गप्पा मारत नाही पण हा बिली त्या एकाकी आजोबांची कहाणी ऐकायला लागतो...त्यांच्या बोलण्यातून कळते त्यांनी २ युद्धात पराक्रम गाजवला पण कुटुंब जपण्यात अयशस्वी ठरले...२ मुल असून ती असून नसल्या सारखी आहेत... अश्याच गप्पा रंगत जातात गावातले राजकारण ,नवीन मुली त्यांची प्रकरणे असेच अनेक काही......आणि आजोबा खुलतात....
त्यांचे अनुभवाचे शब्द येतात "god is great,beer is good ,people are crazy !" बिली त्याचा एकाकी पणा दूर करायला मदत करतो....
रात्र संपताच दोघा आपले आपले रस्ते पकडतात...परत कधी ना भेटण्या साठी...

एका सकाळी बिली पेपर मध्ये बातमी वाचतो की ते आजोबा करोडपती होते...आणि त्यांनी...त्यांची सगळी कमाई बिली च्या नावावर केली आहे....
बिली ला १००% पटते की...." god is great...beer is good....people are crazy !"

याचा video पण तेवढाच सुंदर आहे.....आपल्याला पण असा खूप वेळा अनुभव येतो...एकाकी वाटले तर एवढच लक्षात ठेवा " god is great...beer is good....people are crazy"

Friday, October 29, 2010

शिशिर ऋतू आणि रंगाची उधळण

निसर्गात रंगाची उधळण आणि मस्त थंड हवा ....याला म्हणतात Fall Season म्हणजे शिशिर ऋतू...
मागच्या वर्षी पहिल्यांदा असे रंग बघून मी वेडा होऊन गेलो होतो..त्यामुळे खूप सरळसोट फोटो काढले...दिसले झाड की काढ फोटो असे झाले होते...पण यावेळी खूप विचार करून फोटो काढायचे ठरवले....प्रत्येक फोटो ला काय विचार केला हे आठवत नाही....पण जरा काही तरी वेगळे फोटो काढायचा प्रयत्न केला....

सायकल पण लाल रंगाची असून या केशरी प्रकाशामध्ये ती हरवून गेली आहे..या पडलेल्या प्रत्येक पानाला एक वेगळे अस्तित्व असते...



फायर extinguisher रोज बघायचो मी पण या रंगामध्ये त्याचे अस्तित्व लपून गेले आहे...

href="http://2.bp.blogspot.com/_sSs1r2m0kMg/TMsXlZhvlqI/AAAAAAAAEWU/eAF0mgKyF64/s1600/DSCN7389.JPG">

निळ्याशार आकाशामध्ये वणवा लागल्यासारखे हे झाड दिसते आहे.....



हा माझा रोजचा कॉलेज ला जायचा रस्ता...या दिवसात वेड लावून टाकतो...मन हुर्हुरणे म्हणजे काय ते या रस्त्यावरून जाताना अनुभवतो...



हा तसा नेहमीचा फोटो...पण अशीच पाने आणि त्यांचे रंग रोज दिल खुश करतात....



मला रोज या झाडाच्या खाली मस्त पैकी एक ताणून द्यावीशी वाटते...रंगीबेरंगी प्रकाश आणि निळेभोर आकाश, अजून काय पाहिजे तुम्हाला ...!

Friday, October 22, 2010

डोक्यात फिरणारे एक गाणं ...

मी भारतात असताना इंग्लिश गाणी फार कमी ऐकायचो...एकडे Tennessee ला आल्यावर मला Country Songs चे वेड लागले...या प्रत्येक गाण्याची एक गोष्ट असते आणि ती खूप सरळ शब्दात सांगितली असते.यात सगळी नाती गोती ,प्रेम ,आजोबा आज्जी ,आपले आयुष्य यांचे सुरेख वर्णन केलेले असते...मला इंग्लिश गाणी एकाचा कंटाळा याचा कारण ते धन् धन् काय वाजतंय हे कळायचे नाही...पण Country songs बद्दल तसे होत नाही...
आज मी तुम्हला एक गाणं ऐकवणार आहे ते टीम मक्ग्रव (Tim McGraw) चे एक गाजलेले गाणे आहे..."Don't Take the Girl "...खूप साधे संगीत आणि घुसणारा अर्थ एवढेच सरळ शब्दात वर्णन आहे...


एका जॉनी नावाच्या मुलाची गोष्ट आहे...लहानपणी मासेमारी ला जायला त्याचे बाबा शेजारच्या मुलीला घेऊन जायचा आग्रह करतात पण जॉनी म्हणतो की "जगातल्या कोणाला पण आपल्या बरोबर घ्या पण या मुलीला नको..("Don't take the girl")
नंतर ५ वर्षाने चित्र बदलते ...जॉनी च्या आयुष्यात ती मुलगी सर्वस्व बनते.....एका चोराने त्यामुलीला gunpoint वरती ठेवले असताना परत जॉनी विनंती करतो की...माझे पैसे घे ,हे आजोबांनी दिलेले जुने घड्याळ घे पण या मुलीला घेऊन जाऊ नकोस...( Don't take the Girl )
हे शेवटचे कडवे तर बेक्कार घुसते...डॉक्टर जॉनी ला सांगतात की बाळ वाचेल पण आई नाही वाचणार ....तेव्हां जॉनी देवा समोर गुढगे टेकतो आणि म्हणतो..."मला घेऊन जा या जगातून,पण या मुलीला घेऊन जाऊ नकोस..("Dont take the girl") हे गाणं मी खूप वेळा ऐकले तरी त्याचे शब्द डोक्यात फिरत राहतात...


हा माझं पहिलाच प्रयत्न आहे की country songs बद्दल काही तरी लिहायचा...मला माहित आहे की कुठलही country song शब्दात वक्त करणे अशक्य आहे...पण मला या गाण्यांची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे...म्हणून मी हे धाडस केले...

Wednesday, October 6, 2010

गणपतीबाप्पा मोरया...

नुकताच summer संपला आणि fall चालू झाला होता...आणि त्या दिवशी खूप धुकं होतं...वातावरणात खूप गुढता होतं...हिचकॉक च्या रहस्याकथा मला आठवत होत्या...मागच्या baseball चा light वातावरणात भरून राहिला होता..त्या light च्या effect मुळे या झाडाने मला वेड लावले...


एकडे cookeville मध्ये आम्ही गौतम आणि निवेदिता कडे गणपती बसवतो...साधीच सजावट केली होती... रोज अथर्वशीर्ष आणि आरती असायची...मी पुण्यात असताना रोज कधीच आरतीला जायचो नाही पण एकडे कधी ठरवून बुडवली नाही...;)

पूजेची थाळी मला नेहमी भावून टाकते...कारण मला माहित नाही....

Saturday, September 18, 2010

मागचे काही दिवस...

या पोस्ट मध्ये सगळे वेगवेगळे फोटो आहेत....आधी सारखे फोटोग्राफी ला जायला वेळ नाही मिळत...
Cane Creek ची बदकं माझा आवडता विषय आहे.....त्या संध्यकाळी या बद्काने मला जवळपास २० फोटो जवळून काढून दिले....शेवटी एक झकास pose दिली.....



ही sign बघा ....पोहायला परवानगी नाही....!


माझ्या university मध्ये football game असला की आतिषबाजी करतात....त्यातले हे फोटो ...प्रयत्न केला आहे हात स्थिर ठेवण्याचा ...एका transformer वर कॅमेरा ठेवला आणि click केले....


४ सेकंद shutter speed होता...त्यामुळे click केल्या वर मी कसला फोटो काढतो आहे हे कळत नव्हते....;)


ज्या दिवशी ही आतिषबाजी झाली त्याच्या आधी अर्धा तास मुसळधार पाऊस पडला....हे समोरचे झाड खूप गुढ दिसत होते आणि त्या कार च्या headlight ने अजून फोटो मध्ये मजा आणली...

अश्याच एका संध्याकाळी मी घर बाहेर आलो आणि मला आमची खिडकी दिसली....समोर ईद चा चंद्र दिसला.....सगळं जमून येत होते...आधी वाटलं साध्या कॅमेऱ्याने कोणी चंद्राचे फोटो काढता का?......पण सगळे विचार सोडून देऊन click केले....

Wednesday, August 18, 2010

धडक गाडी आणि पाळीव प्राणी .....

Cookeville च्या जत्रेमध्ये ही माझी आवडती जागा होती.याला एकडे "pet zoo " म्हणतात .या मध्ये लोक येऊन बकरी,उंट ,बैलाला खाऊ घालू शकतात .साप ,अजगर ,कांगारू ,गिनिपिग बघू शकतात .पण मला त्यांच्या cage ची condition बिलकुल आवडली नाही .छोट्याश्या box मध्ये मोठा Burmese python (अजगर) होता .या खालच्या फोटो मध्ये बॉल अजगर (ball python)आहे .त्याच्या मागच्या बाजूला एक सरडा पुन तुम्ही बघू शकतात .या दोन्ही जातींना hiding जागेची गरज असते,पण तीच या cage मध्ये दिसत नाही.


बिचारे कांगारू .त्याला सोडून द्यावेसे वाटत होते.

हा अजून एक अमानुष प्रकार होता .हे pony त्या दोरीला बांधले होते आणि लोक त्यांच्या वर बसून गोल गोल फिरत होते ...मला तेलाच्या घाण्याची आठवण झाली...


नंतर आम्ही Demolition Derby बघयला गेलो .नावच खूप मोठे होते जास्त काही नव्हते.जुन्या गाड्या चिखला मध्ये धडक गाडी धडक गाडी खेळत होत्या.तिकडे हा मुलगा dude दिसत होता.

भसा भासा soft drink पीत होती .मी विचार करत होतो की मोठी झाली की तिच्या आई सारखी बेक्कार जाडी होणार...

या सगळ्या जुन्या गाड्या मैदाना मध्ये आल्या आणि मग चालू झाली "Demolition Derby".पिंक गाडी माझ्या आवडीची होती आणि तीच शेवट पर्यंत टिकली...


असे fire fighters जागोजागी थांबले होते.पण एकदाच छोटी आग लागली .

त्या गाड्या सारख्या चिखलात रुतून बसत होत्या .फक्त काहीच गाड्या फुल फॉर्म मध्ये होत्या.

असा धूर निघून त्या गाडीचा शेवट झाला.पण मजा आली बघयला.