Friday, February 4, 2011

स्वयंपाकाची पहिली इयत्ता पास !!!

(मी माझा "अव्यक्त सर्वकाही " हा ब्लॉग बंद करतो आहे...म्हणून त्याच्या सगळ्या पोस्ट या ब्लॉग वरती टाकतो आहे..)


आमच्या घरात स्वयंपाक म्हणजे आई असे साधे उत्तर आहे.त्यामुळे माझा चहा आणि आम्लेट पर्यंतच gas चा संबध आला होता.तसा मी चहाची गाडी टाकू शकतो येवढा तो बरा व्हायचा.मी आणि नन्या (हेय नाव नेहमीच आत्ता पुढे येणार आहे !) चहा आणि अंडाभुर्जी ची गाडी लावणार होतो पुलं देशपांडे उद्यानासमोर पण आता ते राहून गेले बहुतेक आत्ता Times Square ला लावू. असो.

कॉलेजनंतर मी बंगाल मध्ये आणि कर्नाटका मध्ये नोकरी ला गेलो पण तिकडे एवढे सही जेवण असायचे की घरी बनवायचा प्रयत्न केला नाही.(बंगाली मिठाई नाव नका काढू !) त्यामुळे रस्सम आणि रस्गुल्ल्या मध्ये एक वर्ष निघून गेले. आई नेहमी म्हणायची की "स्वयंपाक शिक् म्हणजे कमीत कमी तुझी बायको तरी मला शिव्या घालणार नाही "...पण कधी मनावर घेतले नाही.

जेव्हां एकडे शिकायला याचे ठरवले तेव्हां वाटायचे की आपण एवढे मोठया reactor मध्ये प्रयोग करतो तसे छोट्या कढई मध्ये करयचे .फक्त "low temperature and open to atmosphere reactor".म्हणून फक्त पद्धत माहिती असली की झालं .एका मागून एक गोष्टी टाकत जायच्या आणि Reaction झाली की gas बंद करायचा असा साधा पुस्तकी विचार केला होता.त्यासाठी मग जय्यत तयरी केली काही पुस्तके विकत घेतली ,sites bookmark केल्या.आणि महत्वाचे म्हणजे आई चा स्वयंपाक २ दिवस बघितला.त्यावरून एक ढोबळ आराखडा बांधला की फोडणी घातली की झाला पुढचं बाप्पा बघून घेईल.

जेव्हां मी एकडे आलो तेव्हां काही पण म्हणा मला आत्मविश्वास बेक्कार जास्त होता.दुसऱ्या दिवशीच मी म्हणलं जरा लाईनीप्रमाणे जाऊ म्हणून चहा बनवायला घेतला.नेहमीच्या सवयीने gas मध्यम ठेवला आणि चहा टाकून पाणी उकळायची वाट बघत बसलो . खूप वेळ वाट बघितली खालची coil तर तापली होती पण पाणी उकळायचे नाव नव्हते. शेवटी कंटाळून gas पूर्ण वाढवला.आपण चूक केली आहे हे कळायच्या आत ते चहा मिश्रित पाणी उतू गेले होते.तरी आपली चूक नाही आपली पद्धत बरोबर आहे coil ची चुकी आहे असे म्हणून दुधावर समाधान मानले.ही तर सुरवात होती.
मग माझ्या स्वयंपाकाच्या turns चालू झाली.पहिल्या दिवशी विचार केला की जीरा राईस बनवू (पद्धत डोक्यात पक्की !)

सगळे मसाले आणि चमचे नीट बाजूला काढून ठेवले.(पद्धत !)पहिला तेलाचाच अंदाज चुकला. जीरा आणि कांदा एकदम टाकला.घरच्या फोडणीचा जसा वास येतो तसा आला थोडा.मग काय confidence अजून वाढला .त्यात लगेचच शिजलेला (electric cooker वर ) भात टाकला पण कालवायचे कसे ? हे फक्त पहिले होते...त्यामुळे तो भात चिकटला ..त्यातून gas लहान करणे माहित नव्हते.असे सगळं चालू असताना त्यात चव येण्यासाठी मिरची( फोडणी मध्ये विसरलेली !) आणि मीठ घातले.शेवटी कळले की हे जे काय आहे ते भयानक आहे .त्या रात्री तो भात घशात उतरताना त्या भाताला पण त्रास झाला असेल.

नंतर आठ महिने असे अनेक अपघात होत राहिले.कधी मिरची चा अंदाज चुकला ,कधी फोडणी देताना कांदा जाळला, भाजीत मसाला न पडता मसाल्यात भाजी पडली, अंडा भुर्जी मध्ये अंडे कच्चे राहिले असं सगळं permutation and combination ने सगळ्या चुका करून झाल्या.या दिवसात मी फक्त बटाटा,डाळ आणि जास्तीत जास्त अंड या मध्येच खेळत होतो.confidence तर कधीच काळाच्या उदरात गडप झालं होता....;) .

या आठ महिन्यात स्वयंपाक नाही आला तरी Patience वाढला . असेच करून बटाटा भाजी चा बेस पक्का झाला.आमच्या घरचा नियम आहे की जेवण खाण्याजोगे नसेल तेव्हां पिझ्झा मागवायचा . माझ्या रुममेट्स ना चांगली सहनशक्ती असल्याने मी २ वेळाच पिझ्झा मागवला. आत्ता तर मागचे काही महिने पिझ्झा मागवायची वेळ आली नाही.
जेव्हां मला फोडणी जमायला लागली तेव्हां मी स्वयंपाकाची "पहिली" इयत्ता पास झालो असे वाटायला लागले.ही पहिली पास होण्यासाठी मला अनेकांनी मदत केली,अनेकांनी माझा स्वयंपाक ना चिडता खाल्ला. आत्ता दुसऱ्या इयत्तेसाठी मी तयार झालो आहे.आत्ता कुठे आईच्या चिमूट भर प्रमाणाचे महत्व कळले आहे.

No comments:

Post a Comment